कराड प्रतिनिधी | मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका १६ वर्षीय शाळकरी मुलाचा पोहताना विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना जखिणवाडी (ता. कराड) येथे घडली. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.
रोहन संदीप पवार (वय १६, रा. गोपाळनगर, कोयना वसाहत) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की रोहन हा त्याच्या मित्रांसमवेत दुपारी दोन वाजता जखिणवाडी येथील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बुडाला. रोहन बुडाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना व नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ कराड शहर पोलिसांना दिली.
कराड शहर पोलिसांनी याबाबत तातडीने कराड अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच कराड पालिकेचे अग्निशमन अधिकारी श्रीकांत देवघरे यांच्यासह कर्मचारी संजय अडसूळ, दादासाहेब जाधव, सुजित साळुंखे, विनोद काटरे, सतीश पवार, अविराज फडतरे, विशाल भिसे यांनी बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.