सातारा प्रतिनिधी । सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाच्या वतीने कृषी योजना राबविण्यात येत आहेत. नवीन सिंचन विहीर खोदकामासाठी यंदापासून ४ लाखांचे अनुदान देण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा लाभाकडे कल वाढला आहे. या योजनेतून यंदा १६ विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ९ विहिरींच्या खोदकामास सुरुवात करण्यात आली आहे.
शेती ही पर्जन्यमानावर अवलंबून आहे. शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यानंतर पीक चांगले येऊन उत्पन्नात वाढ होते. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येतात.
सिंचनाची शाश्वत सुविधा गरजेची
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सिंचनाची शाश्वत सुविधा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने दोन्ही योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विहिरींची कामे पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हा कृषी विकास कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
4 लाखांचे अनुदान
बिरसा मुंडा कृषी क्रांती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यास पूर्वी अडीच लाखांचे अनुदान देण्यात येत होते. आता त्यात दीड लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थीस ४ लाखांचे अनुदान दिले जात आहे. अनुदानात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा.
कृषी स्वावलंबन योजनेतून किती विहिरी?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून यंदा एका विहिरीला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या त्या विहिरीचे काम सुरू झाले आहे.
विहिरींची कामे उन्हाळ्यातच का ?
पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्यास जलसंचय वाढतो. परिणामी, हिवाळ्यात विहीर खोदकाम करता येत नाही. साधारणतः मार्चअखेरपासून भूगर्भातील पाणीपातळी खालावते. त्यामुळे खोदकाम करणे सोपे होत असल्याने उन्हाळ्यात विहिरींच्या कामांना प्राधान्य असते. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.