सातारा जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या 1556 योजनांना मान्यता; 677 योजनांची कामे पूर्ण

0
415
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या असल्याने उष्माघातामुळे अंगाची लाही लाही होत आहे. दुष्काळी भागात तर आतापासूनच पाणी टंचाई भासू लागली आहे. अशात दुष्काळी भागासह पाणी नसणाऱ्या भागात पाणी मिळावे यासाठी ‘हर घर नल से जल’ म्हणजे जलजीवन मिशनचे सातारा जिल्ह्यात वेगात काम सुरू असून १ हजार ५५६ योजनांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यातील ६७७ योजनांची कामे पूर्ण झाल्याने अनेक गावांतील महिलांना पाणीसाठी करावी डोक्यावरील हंडा खाली आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजनेची घोषणा केली होती. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे माणसी ५५ लिटर शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. सातारा जिल्ह्यातही मागील चार वर्षांपासून ही योजना वेगाने सुरू आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन सतत आढावा घेऊन योजना पूर्ण होण्याच्या दृष्टीने सूचना करत आहेत.

मार्च २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. पण, सध्याही या योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक गावांतील योजनांची कामे पूर्ण झाल्याने लोकांना शुद्ध पाणी मिळणे शक्य झालेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होत आहे. पाण्यामुळे उद्भवणारे आजार कमी झाले असून ज्येष्ठ नागरिकांची वणवण थांबली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 677 योजनांची कामे पूर्ण…

या मिशन अंतर्गत २२२ कोटी १३ लाख रुपये किमतीच्या १ हजार ५५६ योजनांना मान्यता देण्यात आलेली. त्यामधील ६७७ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर एकूण पैकी ८२८ या सुधारित करण्याच्च्या योजना असून त्यातील ३५४ शासनास सादर करण्यात आलेल्या आहेत. यामधील १०६ योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

‘जलजीवन मिशन’ अंतर्गत 495 कोटी खर्च

जलजीवन मिशन अंतर्गत २०२३-२४ वर्षात २०९ कोटी ९१ लाख रुपये प्राप्त झाले. हा सर्व निधी खर्च झाला आहे. तर २०२४-२५ वर्षासाठी प्राप्त ६६ कोटी २१ लाखांचा निधीही खर्च झालेला आहे. या मिशनचा आराखडा हा ९२९ कोटी १३ लाखांचा आहे. त्यातील आतापर्यंत ४९४ कोटी ९० लाख म्हणजे जवळपास ५४ टक्के निधी प्राप्त होऊन खर्च झालेला आहे. आता २०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे.

522 योजनांची कामे…

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५२२ योजनांची कामे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेली आहेत. ही कामे दर्जेदारपणे पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना केलेली आहे