सातारा प्रतिनिधी | सद्यस्थितीत विजेची मागणी वाढत चालली असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पारंपरिक ऊर्जा साधनांचा कमीत कमी वापर करून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढावा, यासाठी कृषी सौर वाहिनी, पीएम सूर्यघर अशा योजना हाती घेतल्या आहेत. पालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ अंतर्गत शहरात चार ठिकाणी १५० किलोवॅट क्षमतेचे सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत हे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून, या प्रकल्पांमुळे पालिकेच्या वीजबिलात वार्षिक नऊ लाखांची बचतही होणार आहे.
पीएम सूर्यघर योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५०५ नागरिक स्वतःच स्वतःची वीज तयार करू लागले आहेत. सातारा नगरपालिकेनेही ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सोलर रुफटाफ प्रकल्प कार्यान्वित करून वीजबिल शून्य करण्याकडे एक पाऊल टाकले आहे.
रंगकर्मीच्या हक्काचे ठिकाण असलेले शाहू कला मंदिर, सांबरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र व हुतात्मा उद्यान येथे सोलर संच बसविण्यात आले आहेत.
तर गोडोलीतील आयुर्वेदिक गार्डनमध्ये ही यंत्रणा बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रत्येक ठिकाणी विजेच्या गरजेनुसार सोलर संच बसविण्यात आले असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात वीजनिर्मिती सुरू होणार असून, पालिकेची वीजबिलात मोठी बचत होणार आहे.
18 महिन्याला हजार तयार होणार…
महावितरणच्या निष्कर्षानुसार घराच्या छतावरील एक किलो वॅट क्षमतेच्या सोलर रूफटॉप प्रकल्पातून महिन्याला सरासरी १२० युनिट वीज तयार होते. पालिकेचा १५० किलोवॅट क्षमतेच्या सोलर प्रकल्पाचा विचार केल्यास या प्रकल्पातून महिन्याला सुमारे १८ हजार युनिट वीज तयार होऊ शकते.
वार्षिक 9 लाखांची बचत
1) सातारा पालिकेला शाहू कला मंदिर, सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्र, हुतात्मा उद्यान व आयुर्वेदिक गार्डन या चार ठिकाणांचे मिळून महिन्याला सरासरी ७५ हजार रुपये वीजबिल येत आहे.
2) वीजनिर्मिती प्रकल्पामुळे या चारही ठिकाणचे वीजबिल शून्य होणार असून, पालिकेची वर्षाला सुमारे ९ लाख रुपयांची बचतही होणार आहे.