सातारा प्रतिनिधी । सातारा शहरालगत असलेल्या प्रतापसिंहनगरात गुंड अजय उर्फ लल्लन जाधव (वय २४, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याने साथीदारांच्या मदतीने हातात तलवार, कोयता घेऊन तब्बल १५ हून अधिक वाहनांची तोडफोड केली. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले असून लल्लन जाधव पसार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरातील प्रतापसिंहनगरमध्ये बुधवारी रात्री अजय उर्फ लल्लन जाधव याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन तलवारीने दहशत निर्माण केली. यावेळी त्यांनी एका व्यक्तीवर कोयत्याने देखील वार केला. यामध्ये संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्रीची वेळ असल्याने शिवाय कोणीच रस्त्यावर नसल्याचे पाहून संबंधितांनी रस्त्याच्याकडेला पार्क केलेली वाहने कोयत्याने फोडण्यास सुरुवात केली. बाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरु असल्याचा तसेच गाडयांच्या काचा फुटण्याचा आवाज कानावर पडल्याने नागरिक झोपेतून उठून बाहेर आले. मात्र, हल्लेखोरांच्या हातात तलवार, कोयते असल्यामुळे त्यांना कोणीही विरोध केला नाही.
“अरे बघतोय काय? गाड्या फोड,” असे ओरडून एकमेकांना हल्लेखोर सांगत होते. गाड्यांची तोडफोड केल्यानंतर दहा मिनिटांत दहा हल्लेखोर त्या ठिकाणाहून पसार झाले. हल्लेखोर गेल्यानंतर या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळालै. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी धरपकड करून चाैघा संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, या दरम्यान गुंड लल्लन जाधव पसार झाला. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.