कराड प्रतिनिधी | भरधाव वेगाने जाणारी विजापूर ते सातारा ही एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत घडली. उत्तर मांड नदीच्या पुलावर हा आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यामध्ये चालक व क्लिनर यांच्यासह 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महामार्गावर शिवडे, ता. कराड गावचे हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर विजापूर ते सातारा जाणारी एसटी बस पलटी झाली. या बसमधून सुमारे 15 ते 20 प्रवासी प्रवास करत होते. अचानक बस पलटी झाल्याने प्रवासांना मार लागला. तसेच या अपघातात चालक व क्लीनर गंभीर जखमी झाला.
एसटी बस पलटी झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदतकार्य सुरू केले. दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची पंचनामा सुरू आहे.