तासवडे टोल नाक्यावर मोठी कारवाई; पोलिसांच्या विशेष पथकास सापडली 15 लाखांची रक्कम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठीक ठिकाणी स्थिर पथकांद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहनांच्या तपासणी दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात रक्कम देखील आढळत आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्याजवळ तळबीड पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या विशेष पथकस वाहन तपासणीवेळी 15 लाखांची रोख रक्कम आढळून आल्याची घटना मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित रक्कम व वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आदर्श आचारसंहिता सुरु असल्याने त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुरयांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना वाहनाच्या तपासणीसंदर्भात सुचना करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार कराड तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली होती. दरम्यान, आज दि. २६ रोजी रात्री १ ते ४ या वेळेदरम्यान पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाका येथे तळबीड पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी करीत असतानामध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास कराड ते सातारा या मार्गावर जाणारी एक महींद्रा बोलेरो गाडी क्रमांक (GJ 27 E E 8738)हि तपासणी करिता करीता थांबवले. त्या गाडीतून दोन इसम प्रवास करीत होते. पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये रोख रक्कम मिळुन आली.

त्याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी ती रक्कम सुमारे १५ लाख रुपये असल्याचे सांगितले. ते इमस हे अहमदाबाद (गुजरात) येथे राहणारे असुन ते बंगळूर ते अहमदाबाद असे निघाले होते. त्यांचा औषध, गोळ्या तयार करणारी मशीन बनविण्याची व विक्रीची कंपनी असुन त्यातील मशीन ही लाईफ केअर अमेरिका येथील कंपनीचे मालक राजेंद्रकुमार सुबुध्दी यांना आमची मशीन विक्री करणार असुन त्यांचे बंगळूर येथील एम्पोलॉई विख्यात कुमार नायर यांचेशी त्याबाबत व्यवहार झाला आहे. सदरची रक्कम ही त्या व्यवहाराची आहे असे सांगितले. त्यांनतर पोलिसांनी त्यांच्याकडे असणारी १५ लाख रुपये एवढी रोख रक्कमबाबत पोलिसांच्या पथकाने तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली. तसेच कराड उत्तरचे २५९ भरारी पथकास माहिती देण्यात आल्यानंतर गाडी व रक्कमेसह पोलीस ठाण्यात आणण्यात आली. त्यानंतर याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली.

सदरची रक्कम ही भरारी पथका समक्ष व्हीडीओ चित्रीकरण करुन ताब्यात घेवुन ट्रेझरीमध्ये सुरक्षीरित्या ठेवणेत आली आहे. नक्की ती रक्कम कोणत्या कारणासाठी व कशासाठी आणली होती? याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे. सदर रक्कमेबाबत आयकर विभागाचे अधिकारी यांचेकडुन सविस्तर अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, हवालदार भोसले, पोलीस नाईक दिक्षीत, कॉन्स्टेबल मोरे, राठोड, कुंभार, गायकवाड (चालक), सत्रे यांनी केली.