सातारा प्रतिनिधी । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागु करण्यात आलेली आहे. या योजनेत जिल्हयातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य साधणे/उपकरणे खरेदी करणे करीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ् अबाधित ठेण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागू करण्यात आलेली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यानी ग्रामीण स्तरावरील व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी शहरी भागातील आपल्या अधिनस्त असलेल्या तालुका स्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राव्दारे आरोग्य शिबीराचे आयोजन करावे,
सदर शिबीरामध्ये आशा स्वयंसेविका यांचे सहायाने 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे विहित नमुण्यातील अर्ज भरुन घ्यावेत तसेच अ.क्र.01 ते 27 मुदयांमध्ये माहिती व अर्ज तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे देण्यात यावी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदरची माहिती व अर्ज संकलीत करुन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात यावेत, काम हे आठ दिवसामध्ये पुर्ण करण्यात यावे, याबाबतचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडुन दररोज घ्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डूडी यांनी दिल्या.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 491 अर्ज पात्र
सातारा जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पर्यटन केले जात आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत 1 हजार 532 अर्ज समाज कल्याण विभागाकडे आले असून त्यापैकी 1 हजार 491 अर्ज पात्र झाले आहेत तर बाकी राहिलेले 41 अर्ज काही त्रुटीमुळे बाजूला काढले आहेत त्या अर्जातील त्रुटी पूर्ण करून अर्ज जमा करण्याच्या सूचना संबंधित अर्जदारास केलेल्या असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे उपयुक्त नितीन उबाळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
काय आहे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’?
६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, दुर्बलता याकरिता साधने, उपकरणे खरेदीकरिता साहाय्य, मानसिक स्वास्थ्यासाठी राज्य सरकारने “मुख्यमंत्री वयोश्री योजना” जाहीर केली आहे.
कोण आहे पात्र?
ज्या व्यक्तीचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, असे ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र धरले जाणार आहेत. या लाभार्थीना ३००० रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल.
योजनेचे निकष काय?
1) 31 डिसेंबर, 2023 अखेर वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावीत.
2) आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डची पावती देखील चालणार आहे.
3) आधारकार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे.
4) लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योनजे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो.
5) लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.
काय लाभ मिळतो?
या योजनेअंतर्गत पात्र वृद्धांना एकरकमी ३ हजार रुपये मिळणार आहेत. यातून त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार साहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतात.
कागदपत्रे काय लागतात?
आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळख पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे ड.
योजनेचा अर्ज कसा करावा –
१) या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला या मोबाईल ॲप्लिकेशनचा इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.
२) त्यासाठी आपल्याला प्ले स्टोर वर जायचे आहे व प्ले स्टोर वर “ALIMCO Mitra” असे टाईप करायचे आहे.
३) आता एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन बटन वर क्लिक करायचे आहे.
४) आता आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्यात आपल्याला आपली सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायची आहे जसे की आपले नाव, वडिलांचे नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, राज्य, जिल्हा, पत्ता.
५) आता आपल्याला रजिस्टर या बटनवर क्लिक करायचे आहे.
६) वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला याबरोबर अपलोड करायचे आहेत.
७) खाली एक कॅपचा असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
८) अशाप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आता आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
९) अतिशय सोप्या पद्धतीने घरबसल्या आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.