सातारा प्रतिनिधी । राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा शासकीय कार्यालयाच्या वतीने नुकतेच नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये तब्बल १४३ वाहन चालकांना दृष्टिदोष असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व वाहन चालकांना आरटीओ कार्यालयाकडून मोफत चच्याचे वाटप केले जाणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबर वाई, फलटण, खंडाळा या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक वाहन चालकांना नंबरचे चष्मे आवश्यक असल्याचे समोर आले अशा चालकांना मोफत चष्मे करून देण्यात येणार आहेत. नेत्र चिकित्सा अधिकारी विठ्ठल भोईटे, विलास पाटोळे, खंडागळे यांचे शिबिरासाठी योगदान लाभले. मोटार वाहन निरीक्षक जाकीउद्दीन बिरादार, अश्विनकुमार पोंदकुले, गजानन गुरव, सहायक मोटार वाहन निरीक्षक मोनाली पाटील, अक्षय खोमणे, विशाल थोरात सत्यजित पाटील, चेतन पाटील यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
दरम्यान, वाई तालुक्यात ६४ वाहन चालकाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५४ वाहन चालकाना दृष्टिदोष आढळून आला. फलटणमध्ये १०८ वाहन चालकांची तपासणी झाली. यात ७१ वाहन चालकांना चष्मे आवश्यक असल्याचे समोर आले. खंडाळा तालुक्यात ४२ वाहन चालकाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १८ जणाना दृष्टिदोष असल्याचे निष्पन्न झाले.