सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कुपीत कोल्हापूर येथून १४० पुरातन शस्त्रे दाखल झाली आहेत. शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी नुकतीच ही शस्त्रे अभीरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपुर्द केली असून, संग्रहालयात या वस्तूंचे योग्य ते संवर्धन केले जाणार आहे.
मध्यवर्ती बससस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळावर संग्रहालयाची नूतन इमारत उभी राहिली आहे. या इमारतीत शस्त्र, वस्त्र, तसेच अन्य दालनांच्या निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. या संग्रहालयात साताऱ्याची गादी (तख्त), मिनियर पेंटिंग, तलवारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखत, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघ नखे, बंदुकांचे प्रकार, संगिनी, अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, कातील बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान, विविध प्रकारच्या पगड्या, शेला अशा दोन हजारांहून अधिक ऐतिहासिक शिवकालीन वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.
या वस्तूंमध्ये आता नव्याने १४० पुरातन शस्त्रांची भर पडली आहे.
कोल्हापूर येथील गिरीश जाधव यांनी पुरातन वस्तूंचा संग्रह केला होता. त्यांनी ही शस्त्रे कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे अभीरक्षक उदय सुर्वे यांच्याकडे संवर्धनासाठी सुपुर्द केली. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक डाॅ. तेजस गर्गे यांनी काही शस्त्रे साताऱ्यातील संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.