सातार्‍यात 135 सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतले परवाने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातार्‍यात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला 135 गणेशोत्सव मंडळांनी परवानग्या घेतल्या आहेत. 7 सप्टेंबरपर्यंत परवानगी घेण्याची मुदत आहे. विनापरवाना मंडप उभारणार्‍या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा सातारा पालिकेने दिला आहे.

पावसाच्या सरी झेलत अनेक गणेश मंडळांनी साऊंड व लेझर सिस्टीमच्या दणदणाटात बेधुंद होत गणेश मूर्ती आगमनाच्या मिरवणुका काढल्या. गणेशोत्सवाचा मुख्य दिवस सोडून तब्बल महिनाभर आधीपासूनच गणेश आगमनाच्या मिरवणुका काढण्याचा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस अगोदर सातारा शहर व उपनगरांमध्ये गणेश मंडळांनी सायंकाळनंतर आगमन मिरवणुकांचे आयोजन केले होते. परवानगी मिळवलेल्या या मंडळांकडून गणेशोत्सवाची थाटात तयारी सुरू झाली आहे.

सातारा पालिकेकेकडून आतापर्यंत 135 गणेश मंडळांनी परवाने घेतले आहेत. उर्वरित गणेश मंडळांसाठी 7 सप्टेंबर ही परवाने घेण्याची अंतिम मुदत आहे. परवाने घेण्यासाठी गणेश मंडळांची नगरपालिकेत लगबग सुरू आहे. परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तात्काळ परवाने दिले जात आहेत. गणेश मंडळांना परवान्यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने ‘माय सातारा’ या अ‍ॅपवर ही सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच नोंदणीसाठी वेबसाईटचाही वापर मंडळांना करता येणार आहे.