कराड प्रतिनिधी । घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंडाळे गावात घडली आहे. मृत मुलगा हा आईसक्रिम विक्रेत्याचा असून हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील उंडाळे गावात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन १३ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. अंकेत श्रीगोविंद सिंग, असं मृत मुलाचं नाव आहे. मूळचं उत्तर प्रदेशातील असलेलं हे कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने उंडाळे गावात वास्तव्यास आहे. स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पत्र्याच्या शेडमधील सिलिंडरचा स्फोट
उंडाळे गावात कराड-चांदोली मार्गावर बालिश पाटील यांची वस्ती आहे. त्याठिकाणी मृत मुलाचं कुटुंब वास्तव्यास आहे. एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलिंडर ठेवला होता. तेथून जवळच अंकेत सिंग हा मुलगा अंघोळ करत होता. त्याचवेळी सिलिंडरचा स्फोट झाला. टाकी आणि शेडच्या पत्रा मुलाच्या डोक्यावर आदळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
सिलिडर स्फोटाची तिसरी घटना
कराड शहरात यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडर स्फोटाच्या दोन भीषण घटना घडल्या होत्या. याच वर्षाच्या सुरूवातील १८ जानेवारी २०२४ रोजी कराडच्या बुधवार पेठेतील घरात रात्री दहाच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला होउन चार महिलांसह सात जण जखमी झाले होते. उपचारावेळी त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला होता. मागील वर्षी २६ ऑक्टोबर २०२३ रोजी मुजावर कॉलनीतील शांतीनगरमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटात ९ जण जखमी झाले होते. ७ घरे उध्दवस्त झाली होती. तसेच वाहनांचेही नुकसान झाले होते. त्या स्फोटातील गंभीर जखमी दाम्पत्याचा उपचारावेळी मृत्यू झाला होता. त्यानंतर आज (मंगळवारी) उंडाळे येथे सिलिंडर स्फोटाची तिसरी घटना घडली आहे.