कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील घोगाव येथील पाटीलमळी शिवारात मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून यामध्ये १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. यात मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, शेतीसाठी खत व्हावे या उद्देश्याने कराड तालुक्यातील घोगावातील पाटील मळी शिवारात एका शेतकऱ्याने मेंढ्या बसवल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अंधारात त्या ठिकाणी बिबट्याने येऊन मेंढ्याच्या कळपावर अचानक हल्ला केला. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एकूण मेंढ्यापैकी १३ मेंढ्या जागीच ठार झाल्या.
दुसऱ्यादिवशी आज सकाळी शेतकऱ्याने मेंढ्या बसवलेल्या शेतात जाऊन पाहिले असता त्याला मेंढ्या मृत अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्यानंतर शेतकऱ्याने व ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळाल्यानंतर संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी नजाऊन पंचनामा केला. दरम्यान, घोगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी
पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड दक्षिण हा भाग तसा डोंगराळ भाग असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्यांची, वन्यप्राण्यांची संख्या वाढलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा वनीकरण विभाग शेतकऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज पर्यंत अपयशी ठरलेला आहे. मागील आठवड्यात उंडाळ्यामध्ये भर रस्त्यामध्ये दुचाकीचा पाठलाग करून बिबट्याने पाठीमागे बसलेल्या विद्यार्थ्यांचा चावा घेतलेला होता. यामध्ये विद्यार्थी जखमी झाला होता.
चार दिवसांपूर्वी येळगावमध्ये महिलेसमोरून बिबट्याने नेले शेळीला
कराड तालुक्यातील येळगाव येथे शेत शिवारात गेलेल्या ऐका महिलेसमोर तिच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी महिलेसमोरून तिच्या डोळ्यादेखत बिबट्याने शेळीला पळवून नेले.