कराड प्रतिनिधी । कराड येथील बहुचर्चित असलेल्या शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल १३ कोटी ९ लाख ९६ हजारांचा अपहार केल्या प्रकरणी पतसंस्थेच्या १८ संचालकांससह ५ कर्मचाऱ्यांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याची फिर्याद विशेष लेखा परीक्षक धनंजय गाडे यांनी दिली असून ठेव नसताना ठेव तारण कर्ज, विनातारण कर्ज वितरण, कागदपत्रांचीही पूर्तता न करताच कर्ज वितरणासारखे आणि खोट्या सह्या, बनावट कागदपत्रांच्या आधारावर अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चेअरमन शरद गौरीहर मुंढेकर, शंकर मनोहर स्वामी, महादेव मल्लाप्पा बसरगी, दीपक मारुती कोरडे, उमेश वसंतराव मुंढेकर, सतीश चंद्रकांत बेडके, मिलिंद रामचंद्र लखापती, मनोज चंद्रकांत दुर्गवडे, वृषाली विश्वास मुंढेकर, सिंधू अमोल जुगे, शंकर नागप्पा घेवारी, सर्जेराव सोमनाथ लोकरे, वसंत कृष्णा काळे, श्रीकांत विठोबा आलेकरी, शिवाजी हणमंतराव पिसाळ, महेश लक्ष्मण शिंदे, प्रेमलता चंद्रकांत बेंद्रे, महालिंग तुकाराम मुंढेकर, तात्यासासाहेब आबासाहेब विभूते, तसेच शिवाजी भाऊ मानकर, चंद्रकांत गणपती दुर्गवडे आदी संचालकांसह व्यवस्थापक रवींद्र मृगेंद्र स्वामी, कर्मचारी नितीन रामचंद्र चिंचकर (रा. कालवडे), संग्राम शंकर स्वामी (सध्याचे व्यवस्थापक), सुभाष महादेव बेंद्रे (रा. रविवार पेठ), ज्ञानेश्वरी भिकोबा बारटक्के (रा. रविवार पेठ), दत्तात्रय रघुनाथ शिंदे (रा. कोडोली) व सुनील आनंदा काशीद (हवेलवाडी-सवादे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती व गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिवशंकर पतसंस्थेत एक एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ अखेरचे वैधानिक लेखापरीक्षण झाले. त्या अहवालानुसार पतसंस्थेत पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजार अपहार झाल्याचा ठपका आहे. त्यानुसार संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी कर्ज वितरण करताना तारण न घेणे, अपूर्ण कागदपत्रे, त्यासह व्यवस्थापक व सेवकांच्या मदतीने तयार केलेली खोटी व बनावट कागदपत्रे वापरून, ठेवीदारांच्या हितास बाधा निर्माण केली आहे. त्यामुळे विश्वासघात, फसवणूक करून संचालक मंडळाने हेतूपुरस्सर नियमबाह्य व पदाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने तब्बल ११ कोटी ५३ लाख १६ हजार ९१५ रुपयांचा अपहार केला आहे. त्यासह ठेव नसताना ठेव तारणाच्या नावाखाली तब्बल एक कोटी ५६ लाख ७९ हजारांचे कर्जही वितरण केले आहे.
संबंधित गुन्हा दाखल झालेल्यापैकी संचालक शिवाजी मानकर, चंद्रकांत दुर्गवडे व व्यवस्थापक रवींद्र स्वामी यांचे निधन झाले आहे. धनंजय गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक निरीक्षक कड तपास करीत आहेत.