कराड प्रतिनिधी । कराड येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेत 13 कोटी 9 लाख 96 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार घडला आहे. ठेवी नसताना देखील ठेवतारण कर्जांचे वाटप, विनातारण कर्जे, कागदपत्रांची पूर्तता नसताना कर्ज वितरण, खोट्या सह्या, बनावट कागदपत्रे यांच्या आधारे अपहार करण्यात आल्याचा अहवाल विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी नुकताच दिला आहे. याची चौकशी सुरू असल्याच्या माहितीला कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक के. एन. पाटील यांनी दुजोरा दिला असून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारे निवेदन ठेवीदारांनी पोलिसांना दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील शिवशंकर पतसंस्थेचे दि. 1 एप्रिल 2021 ते दि. 31 मार्च 2023 या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षण धनंजय गाडे यांनी करून, अहवाल दिला आहे. पतसंस्थेत 13 कोटी दहा लाख रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला असून, संबधितांवर गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी सुचवले आहे.
दरम्यान, धनंजय गाडे यांनी दिलेल्या अहवालावरून, पतसंस्थेत अपहार झाल्याचा ठपका सहाय्यक उपनिबंधक जनार्दन शिंदे यांनीही ठेवला आहे. सभासद, ठेवीदारांच्या आर्थिक नुकसानीस जबाबादर असलेल्यांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्याचा आदेश शिंदे यांनी दिला आहे. सभासद, ठेवीदारांचा विश्वासघात करून, संचालकांनी पदांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने अपहार केल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. ठेवी नसताना देखील ठेवतारणाच्या नावाखाली 1 कोटी 56 लाख 79 हजार रुपये कर्ज वितरण झाल्याचे गाडे यांच्या अहवालात नमूद आहे. पोलिसांनी मिळालेल्या अहवालानुसार चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या वतीने देण्यात आली आहे.