‘किसनवीर’कडून FRP चे एकूण 13 कोटी 11 लाख 38 हजार 256 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । भुईंज (ता. वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडे सन 2023-24 मध्ये गळीतास आलेल्या उसाला प्रतिटन 3 हजार रुपये प्रमाणे पहिल्या पंधरवड्याचे बील 13 कोटी 11 लाख 38 हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

किसनवीर कारखान्याच्या गळित हंगामास दि. 3 नोव्हेंबरला सुरुवात झाली होती. कारखान्याने नोव्हेंबर-डिसेंबरच्या पंधरवड्याची सेव्हिंग्जची बीले शेतकऱ्यांची खात्यावर वर्ग केलेली होती. आता पहिल्या पंधरवड्यातील उर्वरित सोसायटीची बीलेही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहेत. किसनवीर व खंडाळा या दोन्ही कारखान्यांना कोणत्याही बँकेचा वित्तपुरवठा होत नसल्यामुळे पहिल्या पंधरवड्यातील बीलांना विलंब झालेला आहे. यापुढील पंधरवड्याची बीले लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत.

दरम्यानच्या काळात काही अपप्रवृत्तींनी कारखान्याविषयी गरळ ओकायला सुरुवात केलेली होती. परंतु कारखान्याचे सुज्ञ सभासद अशा अपप्रवृत्तींना भीक घालणार नाहीत याची खात्री आमच्या व्यवस्थापनास असल्याचा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला आहे. कारखाना व्यवस्थापन कायमच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहते. किसनवीर आणि किसनवीर-खंडाळा हे दोन्ही कारखाने आर्थिक गर्तेतून निश्चितपणे बाहेर काढुन पुन्हा गतवैभव मिळवून देणार असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी सांगितले.

किसनवीर कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्यात (दि. 3/11/23 ते 15/11/23) कारखान्याकडे 43 हजार 712 मेट्रिक टनाचे गाळप झालेले होते. त्यानुसार प्रतिटन 3 हजार रुपयांप्रमाणे होणारी एफआरपीची एकूण रक्कम 13 कोटी 11 लाख 38 हजार 256 रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस हा किसनवीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.