सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे 13 जनावरांचा मृत्यू; बाधितांचा आकडा झाला 202

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून आता बाधित पशुधनाचा आकडा 202 इतका झाला आहे. तर आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने लम्पीने बळी गेलेल्या पशुधनाची संख्या 13 झाली आहे. जिल्ह्यात बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढलेली आहे.

बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढत असून सोमवारी चर्मरोग झालेल्या पशुधनाचा आकडा १६८ होता. मंगळवारी आणखी ३४ जनावरांना लम्पी झाल्याचे समोर आले. त्यामुळे दुसऱ्या लाटेतील एकूण बाधित पशुधनाचा आकडा २०२ झाला आहे. यामध्ये १२८ गायींना रोगाने गाठलेले आहे. तर बाधित वासरांची संख्या ४० झाली असून ३४ बैलांनाही लम्पीने गाठले आहे. त्याचबरोबर उपचाराने लम्पीमुक्त पशुधनाची संख्या २८ झाली आहे. तर मंगळवारी आणखी एका जनावराचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांत लम्पीने मृत झालेल्या जनावरांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.

मागीलवर्षी आॅक्टोबर ते २०२३ मधील मार्चपर्यंतच्या लम्पीच्या पहिल्या लाटेत सुमारे २० हजारांवर जनावरांना चर्मरोगाने गाठले होते. तर १ हजार ४८० जनावरांचा मृत्यू झाला होता. यातून बळीराजा सावरत असतानाच जिल्ह्यात दुसरी लाट सुरू झालेली आहे. मागील १५ दिवसांपासून लम्पी बाधित जनावरे आढळून येत आहेत. फलटणपासून सुरुवात होऊन आता अनेक तालुक्यात बाधित जनावरे झालेली आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तर दिवसेंदिवस बाधित जनावरांचा आकडा वाढत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.