सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी स्कीन या आजाराने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. खटाव, महाबळेश्वर, पाटण तालुके वगळता जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लम्पीने जिल्ह्यात १३ जनावरांचा मृत्यू झाला असून, ५१० जनावरे बाधित आढळून आली आहेत.
जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या १३९ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या वर्षापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्किनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले. या वर्षीही पुन्हा लम्पीचा प्रार्दुभाव वाढला असून, जिल्ह्यात ५१० जनावरे बाधित सापडली आहेत. उपचारानंतर ३५० जनावरे बरी झाली आहेत, तर १३९ जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार सुरू आहेत.
कोरेगाव तालुक्यात २३, सातारा १३, माण दोन, फलटण आठ, खंडाळा ३०, वाई २८, जावळी २६, तर कऱ्हाड तालुक्यात नऊ बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर खंडाळा सात, कोरेगाव चार, वाई एक, जावळी एक जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.