कृष्णा कारखान्याकडून व्हॅट, GST पोटी 122.92 कोटींचा भरणा, वस्तू व सेवाकर विभागाने केला सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यात महसूल कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने व्हॅट व जीएसटी करापोटी १२२.९२ कोटी रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक महसूल उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे सातारा कार्यालयाने कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे.

शासनाची तिजोरी मजबूत करण्यामध्ये करांचा वाटा मोठा असतो. विविध संस्थांच्या आणि व्यवसायांच्या माध्यमातून शासनाकडे दरवर्षी मोठी रक्कम कर रूपाने गोळा होत असते. कृष्णा कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत, सहकार व उद्योग क्षेत्रात स्वत:ची छाप पाडली आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने शासनाकडे व्हॅट करापोटी ९५.१३ कोटी रूपये आणि जीएसटीपोटी २७.७९ कोटी असा एकूण १२२.९२ कोटी रूपयांचा भरणा केला आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यात सर्वाधिक रकमेचा महसूल कर कृष्णा कारखान्याने शासनाकडे भरला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, सर्व संचालक मंडळ, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्वाधिक कर भरणा केल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कृष्णा कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे. सत्कार समारंभात राज्य कर सहआयुक्त श्रीमती सुनीता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त (प्रशासन) श्रीमती अश्विनी ठाणेकर यांच्या हस्ते व राज्यकर उपायुक्त नंदकुमार सोरटे, राज्यकर उपायुक्त प्रकाश कुलकर्णी, राज्यकर उपायुक्त सलीम बागवान, यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याच्यावतीने टॅक्स अकौंटंट विठ्ठल साळुंखे यांनी सन्मान स्वीकारला.