साताऱ्याच्या आराखड्यात 121 बदल; मंजुरीसाठी शासनास होणार साद

0
3

सातारा प्रतिनिधी | वाढती लोकसंख्‍या व इतर बाबींचा विचार करत पुढील २० वर्षांसाठीचा विकास आराखडा पालिकेने तयार केला होता. या आराखड्यावर नागरिकांनी नोंदविलेल्‍या हरकती, आक्षेपांचा विचार करत त्‍या आराखड्यात १२१ बदल करण्‍यात आले आहेत. या बदलांचा अंतर्भाव असलेला सुधारित प्रस्‍तावित विकास आराखडा पालिकेने प्रकाशित केला असून, तो आता अंतिम मंजुरीसाठी शासनास पाठविण्‍यात येणार आहे.

आगामी काळातील वाढती लोकसंख्‍या, विस्‍तारणारे शहर आणि हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्‍या भागांना सामावून घेणारा प्रस्‍तावित प्रारूप विकास आराखडा पालिकेच्‍या मार्फतीने तयार करण्‍यात येत होता. सुमारे एक वर्षांहून अधिक काळ यासाठीचे काम सुरू होते. हे काम अंतिम झाल्‍यानंतर तयार केलेला प्रारूप विकास आराखडा नागरिकांसाठी खुला करण्‍यात आला होता.

यात २२२ ठिकाणे विविध विकासकामे तसेच इतर कारणांसाठी आरक्षित करण्‍यात आली होती. तयार केलेला विकास आराखडा, आरक्षित केलेल्‍या जागा व इतर बाबींच्‍या अनुषंगाने नागरिकांनी यानंतरच्‍या काळात हरकती, आक्षेप त्‍यासाठी तयार केलेल्‍या समितीसमोर नोंदवल्‍या.

या हरकती, आक्षेपांचा विचार करत त्‍यानुसार प्रारूप विकास आराखड्यात काहीअंशी बदल करण्‍याचे काम पुन्‍हा सुरू करण्‍यात आले. यानुसार १२१ बदल असणारा सुधारित प्रारूप विकास आराखडा पालिकेच्‍या मार्फतीने तयार करण्‍यात आला.