सातारा प्रतिनिधी | पुण्यातील कात्रज भागातून ७० लाखांसाठी अपहरण करण्यात आलेल्या १२ वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात पुणे पोलिसांना सातारा पोलिसांच्या मदतीने यश आले आहे. सातारा तालुक्यातील पाटेघर येथील डोंगरामध्ये अपहरणकर्ते लपले होते. पोलिसांची चाहूल लागताच मुलाला तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले.
७० लाखांसाठी मुलाचे अपहरण
कात्रज भागातील भिलारवाडी येथून राजेश सुरेश शेलार या आरोपीने १८ फेब्रुवारी रोजी १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. ७० लाख दिले तर मुलाला सोडण्यात येईल. पोलिसात तक्रार दिली तर मुलाच्या जीविताचे बरे वाईट करण्याची धमकीही अपहरणकर्त्याने दिली होती. पीडित मुलाच्या पित्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली होती.
आरोपी लपले साताऱ्यातील पाटेघरच्या डोंगरात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे झोन २ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, नंदिनी वग्यानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित मुलाची सुखरूप सुटका करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. अपहृत मुलाला घेऊन आरोपी पाटेघर (ता. सातारा) येथील डोंगरामध्ये लपले असल्याची माहिती तपास पथकांना मिळाली.
सातारा एलसीबीच्या मदतीने मोहिम फत्ते
पुणे गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकांनी सातारा एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि स्टाफच्या मदतीने पाटेघर डोंगर परीसर पिंजुन काढला. पोलीस आल्याची चाहुल लागल्याने संशयितांनी अपहृत मुलास डोंगरात सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. पोलिसांनी अपहृत मुलाला ताब्यात घेतले आहे. फरार झालेल्या आरोपींचा पोलीस पथके शोध घेत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त (झोन परिमंडळ २) स्मार्तना पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, आणि गुन्हे शाखा, युनिट २, अमोल रसाळ यांच्यासह सातारा स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.