सातारा प्रतिनिधी | घरात खेळण्यासाठी झोपाळा बांधत असताना अचानक फास लागून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वळसे, ता. सातारा येथे १ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता घडली. केवळ पंधरा मिनिटांसाठी आई घराबाहेर गेली होती. त्यावेळी हा प्रकार घडला.
विश्वजित प्रमोद चव्हाण (वय १२) असे गळफास लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वजीत याचे वडील कामावर गेले होते. तर घरी विश्वजीत, त्याचा लहान भाऊ आणि आई होती. दुपारी बारा वाजता त्याच्या आईने त्याला ‘चल आपण महा-ई-सेवा केंद्रात जाऊन येऊ,’ असे सांगितले. परंतु त्याने ‘मी घरात खेळतोय. तू जा,’ असं आईला सांगितलं. त्यामुळे त्याची आई महा-ई सेवा केंद्रात गेली. विश्वजीतने झोपाळा बांधण्यासाठी आईची साडी घेतली. काॅटवर उभा राहून त्याने घराच्या छताच्या अॅंगलला साडी बांधली.
परंतु साडीची लांबी जास्त असल्यामुळे साडी त्याच्या गळ्याभोवती गुंडाळली. अचानक काॅटवरून त्याचा पाय निसटल्याने त्याच्या गळ्याला फास लागला. त्याला आरडाओरडही करता आली नाही. अन्यथा त्याच्या आवाज ऐकून शेजारीपाजारी तरी त्याच्या मदतीला धावून आले असते. महा ई-सेवा केंद्रातील काम आटोपल्यानंतर त्याची आई पंधरा मिनिटांत परत घरात आली.
त्यावेळी विश्वजीतला फास लागलेला होता. हे पाहून आईने हंबरडा फोडला. आईच्या आवाजाने आजूबाजूचे लोक त्यांच्या घरात आले. विश्वजीतचा फास सोडवून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. विश्वजीत हा इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. तो हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या निधनामुळे वळसे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धोंडिराम वाळवेकर तसेच अंमलदार म्हेत्रे, महिला पोलिस हवालदार मोनिका निंबाळकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बोरगाव पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.