सातारा प्रतिनिधी | बेलावडे (ता. जावळी) येथे १२ फूट लांब अजगर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साताऱ्यातील सर्पमित्र महेश शिंदे व त्याच्या टीमने त्यास जिवंत पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. हे अजगर वन विभागाच्या मदतीने पुणे (बावधन) रेस्क्यू टीमकडे उपचारासाठी सुपूर्द करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बेलावडे येथे विश्वजित शिंदे यांना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतात चक्क १२ फूट लांबीचे अजगर दिसून आले. याची माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिली. मात्र, हे अजगर न मारता ते सुखरूपपणे पकडण्यासाठी त्यांनी सर्पमित्र महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला.
महेश शिंदे हे ओंकार ढाले, मयूर अडागळे, रोहन अहिरे, महेश अडागळे, मयूर तिखे, करण भगत यांच्यासमवेत साताऱ्यातून बेलावडे गावात दाखल झाले. त्यांनी अजगर सुखरूप पकडले. त्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, गणेश महांगडे, नीलेश रजपूत, चौगले, नेताजी वासुदेव, लांडगे, आकाश कोळी, समाधान वाघमोडे, राहुल धुमाळ, नवनाथ महामुलकर यांच्या मदतीने पुणे रेस्क्यू टीमकडे सुपूर्द करण्यात आले.