सातारा प्रतिनिधी । २५५ फलटण – कोरेगाव (अजा) विधानसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी शेवटच्या दिवशी २६ उमेदवारांच्यापैकी १२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार दि. ३० रोजी फलटण तहसील कार्यालयात झाली होती. सन २००९, २०१४ व २०१९ असे सलग ३ वेळा या मतदार संघातून विजयी झालेल्या दिपकराव चव्हाण यांनी चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे सचिन सुधाकर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून फाईट देणार आहेत.
गत काही महिन्यापासून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात “एकच निर्धार; बौद्ध आमदार” हि चळवळ संविधान संघर्ष समितीच्या वतीने उभारण्यात आली होती. या साठी बौद्ध समाजातील अनेक मान्यवरांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यानंतर बौद्ध समाजाच्या वतीने ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रा. रमेश आढाव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांच्या उमेदवारीला संविधान संघर्ष समितीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
या मतदार संघातून यापूर्वी २ वेळा निवडणूक आखाड्यात उतरुन लक्षणीय मते घेतलेल्या दिगंबर आगवणे यांनी यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व अपक्ष असे २ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या पत्नी व पंचायत समितीच्या माजी सदस्या जयश्री आगवणे यांनीही २ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामधील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिगंबर आगवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सौ. प्रतिभा शेलार (बहुजन समाज पार्टी), दिपक रामचंद्र चव्हाण, सचिन जालिंदर भिसे (वंचित बहुजन आघाडी), अमोल मधुकर करडे, ॲड. कांचन कन्होजा खरात, कृष्णा काशिनाथ यादव, गणेश वाघमारे, चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव, सूर्यकांत मारुती शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून फलटण – कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.