सातारा प्रतिनिधी | माण (२५८) विधानसभा मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे विरुद्ध माजी आमदार प्रभाकर घार्गे असा सामना रंगणार आहे. माणमध्ये आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी १२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. महत्त्वपूर्ण अशा संदीप मांडवे, नंदकुमार मोरे, अनिल पवार यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अर्ज माघारी घेण्याची काल सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत होती. सकाळपासून दोन वाजेपर्यंत फक्त चार अर्ज माघारी घेतले गेले होते. मात्र, शेवटच्या अर्ध्या तासात आठ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामध्ये सर्वांच्या नजरा लागलेले खटावचे माजी सभापती पैलवान संदीप मांडवे, राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी आपले अर्ज माघारी घेतले, तसेच जनता क्रांती दलाचे सत्यवान कमाने यांनीही आपला अर्ज माघारी घेतला. उर्वरित महेश करचे, विकास देशमुख, सारिका पिसे, नागेश नरळे, हर्षद काटकर, ज्योत्स्ना सरतापे, राजेंद्र बोडरे, शिवाजी मोरे आदी उमेदवारांनीही माघार घेतली असल्याची माहिती माण-खटाव विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली.
रिंगणातील हे उमेदवार उभे
जयकुमार भगवानराव गोरे, प्रभाकर देवबा घार्गे, प्रसाद मल्हारराव ओंबासे, अरविंद बापू पिसे, अर्जुनराव उत्तम भालेराव, इम्तियाज जाफर नदाफ, सनीदेव प्रभाकर खरात, सत्यवान विजय ओंबासे, दादासाहेब गणपत दोरगे, अजित दिनकर नलवडे, अजिनाथ लक्ष्मण केवटे, जयदीप पांडुरंग भोसले, नानासाहेब रामहरी यादव, सोहम ऊर्फ सोमनाथ लक्ष्मण शिर्के, संदीप जनार्दन खरात, जितेंद्र गुलाब अवघडे, नारायण तातोबा काळेल, बजरंग रामचंद्र पवार, बाळराजे रेवण वीरकर, प्रभाकर किसन देशमुख, अमोल शंकरराव घार्गे.