कराड प्रतिनिधी । राज्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण काही ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत बाकी होती. दरम्यान, राज्यातील २ हजार २१६ ग्रामपंचायतींच्या सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. तर त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता ज्या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे त्या गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
सातारा जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित आणि चुकीची प्रभाग रचना झाल्याने निवडणूक होऊ न शकलेल्या सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायती आहेत. यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा सोडत कार्यक्रम दि. १६ जून ते दि. १४ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार दि. १६ जूनला विशेष ग्रामसभेची सूचना देणे, दि. २१ जूनला विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. २२ जूनला सोडतीनंतर विभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप स्वरूप प्रसिद्ध करायचे आहे.
प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना २३ जून ते ३० जूनपर्यंत करायच्या आहेत. या हरकतींवर उपविभागीय अधिकारी हे ६ जुलैपर्यंत अभिप्राय देतील. त्यानंतर अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी दि. १४ जुलैला मान्यता देतील तर दि. १४ रोजी प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
राज्यातील २२८९ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाल्या आहेत. प्रभाग रचना पूर्ण झालेल्या सर्व ग्रामपंचायतीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम राबविणे क्रमप्राप्त आहे. ओबीसी आरक्षणाची टक्केवारी निश्चित न झालेल्या अशा ७९ ग्रामपंचायती वगळता उर्वरित २२१६ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.