सातारा प्रतिनिधी | सातार्यात गणेश विसर्जनसाठी बुधवार नाका या मुख्य विसर्जनस्थळी 110 टनी क्रेन तैनात करण्यात आली आहे. श्री गणेश विसर्जनासाठी नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी 9 पथके तयार केली आहेत. त्यामध्ये सुमारे 229 कर्मचार्यांचा समावेश आहे. विसर्जन मार्ग तसेच विसर्जनस्थळी सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे.
सातार्यात श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने चोख व्यवस्था केली असून मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी विसर्जनासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. सातार्यात मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन बुधवार नाका या मुख्य कृत्रिम तळ्यात करण्यात येणार आहे. या तळ्यावर 110 टनी महाकाय क्रेन तैनात करण्यात आली आहे. श्री गणेश विसर्जनाची व्यवस्था पोहणे तलाव (राजवाडा), हुतात्मा स्मारक (नेताजी सुभाषचंद्र बोस चौक) कृत्रिम तळे, सदरबझार तक्षशिला शाळा (दगडी शाळा) कृत्रिम तळे तसेच गोडोली गार्डन (कल्याणी शाळेसमोर) कृत्रिम तळे येथे करण्यात आली आहे.
या तळ्यात प्रामुख्याने घरगुती गणेश मूर्ती विसर्जन करण्यात येत आहेत. घरगुती गणेश विसर्जसाठी नगरपालिकेने शाहूपुरी, विलासपूर आदि ठिकाणी पाण्याचे हौद, कुंड यांची व्यवस्था केली आहे. कृत्रिम तळे येथे कर्मचार्यांची 9 पथके असून सुमारे 229 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लाईफ गार्डही नेमण्यात आले आहेत. निर्माल्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध केली आहे.
मोती चौक-कमानी हौद चौक ते खालच्या रस्त्यावरील शेटे चौक-शनिवार चौक ते मोती चौक ते प्रतापगंज पेठ मार्गे बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळे असा विसर्जन मार्ग आहे. गणेश भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. कृत्रिम तळे तसेच विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. कृत्रिम तळ्यांवर आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. तळ्यांभोवती बॅरेकेटिंग उभारण्यात आले आहे. आवश्यक तिथे कृत्रिम तळ्यांवर विसर्जनासाठी स्टेजची व्यवस्था केली आहे.