सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस

0
34
Satara ZP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्यावतीने केले जात आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून महा ई- ग्राम संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहेे. या प्रणालीच्या वापरातून सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे निवडलेल्या ग्रामपंचायती पेपरलेस होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील पेपरलेस ग्रामपंचायतीसाठी निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अकरा तालुक्यातील प्रतेकी 10 ग्रामपंचायतींना समावेश आहे. सातारा तालुक्यातील 10, कोरेगाव 10, खटाव 10, माण 10, फलटण 10, खंडाळा 10, वाई 10, जावली 10, महाबळेश्वर 10, कराड 10 व पाटण तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामसेवकांचे कामकाज हे ऑनलाईन होणार आहे.

कार्यालयांमधील कागदपत्रांचा ढीग कमी होणार आहे. यामुळे कर्मचारी व नागरिकांचा पैसा व वेळेत बचत होणार आहे. महा-ई ग्राम ही प्रणाली राबवण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यासाठी तालुका स्तरावर समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या कार्यक्रमाची जबाबदारी ग्रामपंचायतीचे केंद्रचालक, ग्रामसेवक व संबंधित विस्तार अधिकार्‍यांची राहणार आहे. निवड केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यवाही पूर्ण केल्यानंतर या ग्रामपंचायती दि. 2 ऑक्टोबर रोजी पेपरलेस ग्रामपंचायती म्हणून जाहीर करण्यात येणार आहे

पेपरलेस ग्राम पंचायतीमधून या मिळणार सुविधा…

सातारा जिल्ह्यातील निवडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये संगणक प्रणालीमध्ये ग्रामपंचायतीकडील 1 ते 33 नमुने संगणीकृत करणे, स्वयंघोषणापत्रे व 1 ते 7 प्रकारचे दाखले देणे, मासिक प्रगती अहवाल, मुलभूत माहिती इत्यादी सुविधा प्रामुख्याने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संगणक प्रणालीचा वापर सर्व ग्रामपंचायतीमध्ये सुरू करावयाचा आहे. सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, केंद्र चालक, विस्तार अधिकारी पंचायत यांचे प्रशिक्षण त्या त्या तालुक्यात घेण्यात आले आहे.