सातारा प्रतिनिधी | दुष्काळी खटाव तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. नेर सोडून तालुक्याच्या पूर्व भागातील येरळवाडीसह सर्वच तलाव, धरणे आणि बहुतांश विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. प्रशासनाकडून ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 11 गावांना विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवले जात आहे. पशुधनाच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत असून पशुपालक मेटाकुटीला आला असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
खटाव तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. तालुक्याच्या दक्षिण आणि उत्तर भागात डिसेंबर महिन्यापासूनच टंचाई जाणवू लागली होती. जिहे- कठापूर योजनेचे पाणी नेर धरणात आणि उरमोडीचे पाणी लाभक्षेत्रात सोडल्याने काही भागात टंचाई थोडी सुसह्य झाली होती. मात्र, आता पुन्हा टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. ज्या भागात कोणत्याच योजनेचे पाणी जात नाही त्या भागात दुष्काळाने हाहाकार उडाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. येरळा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. तर येरळवाडी धरणातील पाणीसाठा कमी झाला असून त्यावर तालुक्यातील पूर्व भागातील बहुतांशी नळपाणीपुरवठा योजना असून धरण कोरडे पडल्याने या योजनांना घरघर लागली आहे.
खटाव तालुक्यात आजच्या घडीला ३० टँकरच्या ६७ खेपांद्वारे ४१ गावे आणि १०७ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. ६६ हजार २९५ लोकसंख्येला आणि १२ हजार १४१ जनावरांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. १९ गावांना विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहण करुन पाणी दिले जात आहे. आणखी काही गावांचे टँकरसाठीचे प्रस्ताव मागणी होत आहे. पशुधनाच्या चाऱ्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने उन्हाळी पिके वाया गेली आहेत. ज्या भागात उरमोडी, जिहे कठापूरचे पाणी पोहचले होते, त्या भागात थोडा फार चारा उपलब्ध झाला आहे. मात्र, तालुक्याच्या बहुतांश भागात जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता झाली आहे.