सातारा प्रतिनिधी । जुन्या पेन्शनसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. सातारा जिल्ह्यातील संगठीत व असंगठीत क्षेत्रातील कामगारांच्या तब्बल ११ संघटनांनी एकत्र येऊन सातारा शहरातून बाईक रॅली काढली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले.
सातारा जिल्ह्यातील ११ संघटनांनी जुनी पेन्शन योजनेबाबत मागणी केल्यानंतर शासनाकडून ती पूर्ण करण्यात आली नसल्याने ७ दिवसांचा अल्टिमेटम संघटनेने दिला होता. तसेच तो मुख्यमंत्र्यांनी पाळून तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्याबाबत योग्य निर्णय न झाल्याने बुधवारी जिल्ह्यातील ११ संघटनांनी बाईक रॅली काढली. सातारा शहरातील क्रांती स्तंभ, हजेरी माळ येथून सुरू करून पोवई नाका, नगरपालिका, राजपथ, गांधी मैदान याच मार्गाने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली नेण्यात आली.
या रॅलीमध्ये तब्बल १ हजार ८७५ दुचाकीवरून ३ हजार ७०० जण तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ हजार ४८० आंदोलकांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वांनी जोरदार निदर्शने देखील केली. यानंतर सर्व संघटनांच्या नेत्यांनी मार्गदर्शन करून शासनाने मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी केली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे गणेश देशमुख, समन्वय समितीचे अध्यक्ष नेताजी डिसले, किरण यादव, अस्लम तडसरकर, सोमनाथ बाबर, प्रमोद परमणे, आर. जी. तुपे, शशिकांत सुतार, माणिक अवघडे, शंकर पाटील, अरुण शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे दुचाकी रॅली काढून आंदोलन करण्यात आले.