कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील दरुज, दरजाई येथील तलावातून अज्ञात चोरटयांनी सुमारे 2 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 13 वीज मोटार शेतीपंप चोरी केले होते. त्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी चोरटयांकडून 2 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 वीज मोटार शेतीपंप जप्त केले.
लालासो श्रीरंग पाटोळे व सुशांत शिवाजी पाटोळे (दोघेही रा. दरजाई ता. खटाव जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १० जुलै रोजी सायंकाळी १६ ते दि. १६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दरुज दरजाई ता. खटाव गावच्या हद्दीतील पाझर तलाव्यातील सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीचे १३ वीज मोटार शेतीपंप चोरुन नेले. तसेच त्यासाठी लागणारी केबल व सक्शन पाईप तोडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकरी सतिश भगवान बोटे यांनी चोरीबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन पुसेगाव पोलीस ठाण्यात रजि.नं. १४२ / २०२३ भा. द. वि. कलम ३७९, ४२७ प्रमाणे दि.२२/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी तपास केला असता त्यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी लालासो श्रीरंग पाटोळे व सुशांत शिवाजी पाटोळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता,
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेला १३ वीज मोटार शेतीपंपापैकी ११ वीज मोटार शेतीपंप पोलिसांच्या ताब्यात दिला.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाणेचे सपोनि शिवाजी भोसले, पो.उप.नि. बाळासाहेब लोंढे, सहा. फौजदार सुधाकर भोसले, चंद्रहार खाडे, पो.हवा. दिपक बर्गे, पो. ना. सुनिल अब्दागिरे, पोलीस अंमलदार शंकर सुतार, अविनाश घाडगे, पोपट बिचुकले, अमोल जगदाळे व होमगार्ड पथक यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाईत सहभागी असणारे अधिकारी व अंमलदारांचे समीर शेख, बापू बांगर, राजेंद्र शेळके यांनी अभिनंदन केले आहे.