सातारा प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकजण तलाव, कालवा तसेच नदीकाठी पोहायला जात आहेत. मात्र, पोहताना अनेकांच्या जीवाशी येत आहे. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे मंगळवारी सकाळी घडली आहे. येथील निरा उजव्या कालवा परिसरात गेलेल्या शाळकरी मुलाने पुलावरून कालव्यात उडी टाकली. मात्र, पोहता नीट येत नसल्याने तो बुडाला होता. त्यातच कालव्यातील पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तो वाहून गेला. रात्री उशिरा या मुलाचा मृतदेह नेवसे वस्ती याठिकाणी आढळून आला.
अनिकेत शंकर पवार (वय 14, रा. लोणंद, ता. खंडाळा) असे या बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वडिल शंकर पवार हे अपंग असून त्यांना हा एकुलता एकच मुलगा होता. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लोणंद येथील अनिकेत पवार हा दहावीत शिकत असलेला मुलगा शेजाऱ्याबरोबर पाडेगाव येथील निरा उजवा कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याने लोणंद- निरा मार्गावर असलेल्या निरा उजवा कालव्याच्या पुलावरून पाण्यात उडी मारली.
मात्र, त्याला नीट पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खात पाण्याच्या मध्यभागी बुडाला. पाण्याचा प्रवाह खूप असल्याने आणि किनाऱ्यापासूनचे अंतर जास्त असल्याने त्याला वाचवता येणे शक्य झाले नसल्याचे आजूबाजूला असलेल्या लोकांनी सांगितले. त्यानंतर बराच शोध घेऊनही तो सायंकाळी उशिरापर्यंत सापडला नव्हता. मात्र, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नेवसे वस्ती याठिकाणी अनिकेतचा मृतदेह आडकलेला आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कय्युम मुल्ला आणि पोलीस हवालदार विष्णू गार्डे यांनी घटनास्थळाला भेट दिली. लोणंद येथील शंकर पवार हे अपंग असून अनिकेत हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. आपल्या एकुलत्या एक मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने पवार यांनी आक्रोश केला. या घटनेनंतर घटनास्थळी नातेवाईक व बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.