कराड प्रतिनिधी । कोयना आणि कृष्णा नदीतून सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याचा उपसा केला जातो. परंतु, नदीपात्र कोरड पडल्यानं पाणी योजनांचे जॅकवेल उघडे पडले. परिणामी, अनेक गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला. कळशा, घागरी घेऊन नदीपात्रात साचलेलं पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली होती. त्यानुसार नदीकाठच्या नागरिकांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार आणि सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाण्याची मागणी झाल्याने कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करुन मंगळवारी सकाळच्या सुमारास १ हजार ५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणात १०१.४५ टीएमसी पाणीसाठा होता. जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले. वार्षिक सरासरीच्या सुमारे १२० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे. तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे यंदा कोयना धरण ओव्हरफ्लो झाले. परिणामी पावसाळ्याच्या काळात धरणाचे दरवाजे उघडून पाणी विसर्ग करण्यात आला. आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापासून धरणातील विसर्ग थांबला होता. पण, सध्या सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाकडून कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी सुरू झाली आहे.
पावसाळ्यानंतर प्रथमच सांगली पाटबंधारे विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी झालेली आहे. सिंचन आणि बिगर सिंचनासाठीची ही मागणी आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने मंगळवारी सकाळी १० वाजता पायथागृहाचे एक युनिट सुरू केले आहे. या युनिटमधून १ हजार ५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. कोयना नदीपात्रातून हे पाणी पुढे जात आहे. तसेच भविष्यातही सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढत जाणार आहे.
कोयना नदीकाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या विहिरींच्या कामांमध्ये अडथळा येईल म्हणून धरणातून १५ डिसेंबरनंतर पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नदीपात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाणी योजना ठप्प झाल्या. तसेच सांगळीकडून देखील पाणी सोडण्याची मागणी झाल्याने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना रविवारी याबाबत माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी धरणातून पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.