सातारा प्रतिनिधी । राज्यात दहावीच्या (10 th Board Exam 2024) परीक्षेस आज शुक्रवार दि. १ मार्चपासून सुरुवात झाली असून सातारा जिल्ह्यातील ११६ परीक्षा केंद्रातून ३७ हजार ६५८ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने या परीक्षांची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात १५ परिरक्षक केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. परीक्षे दरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांमध्ये १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. शाळेतील सुमारे ३७ हजार ६५८ विद्यार्थी यासाठी प्रविष्ट असून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. परीक्षा काळात कोणीही कॉपी करणार नाही यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सापडलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची कोणत्याही कारणांनी गय केली जाणार नसल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
भरारी पथकात ‘या’ अधिकाऱ्यांचा समावेश
दहावीच्या बोर्डा मार्फत जिल्हास्तरीय नियुक्त भरारी पथके प्रत्येक तालुक्यात ठेवण्यात आली आहेत. एक तहसीलदार, गटविकास अधिकारी, एक गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक केंद्रावर एक बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभाग प्रमुखांचे प्रत्येक तालुक्यात एक पथक तैनात राहणार आहे.