सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अयोध्या बघता यावी, प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे या साठी भाजपच्या वतीने ‘आस्था’ रेल्वेचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, काल शनिवारी सातारा जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघातून या ‘आस्था’ रेल्वेने 1 हजार 368 भाविक अयोध्येसाठी रवाना झाले.
काल शनिवारी (दि. 2) मार्च रोजी ही रेल्वे सातारा रेल्वे स्टेशन (माहुली ) येथून अयोध्येसाठी रवाना झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले, डॉ. प्रियाताई शिंदे, कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे उपस्थित होते.
यावेळी सर्व रेल्वे स्टेशनवर “जय श्रीराम ” चा जयघोष देखील करण्यात आला. दरम्यान, रेल्वेच्या खिडक्यावर भाजपाचे झेंडे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक बोगीला श्रीराम भक्तांच्या स्वागताचे बॅनर झळकत होते. सर्वांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या,एक मेकांना जय श्रीराम म्हणतं भाविक फोटो, सेल्फी काढत होते. रेल्वेने अयोध्येस जाणाऱ्या कार्यकर्त्यांची नाष्टा, चहा, जेवण, पाणी याची अत्यंत सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी भाजपाचे फक्त 40 पदाधिकारी या रेल्वेमधून पाठवले असून त्यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णा पाटील, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुनीषा शहा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष गौरी गुरव, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, माण विधानसभा निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सुनील शिंदे, मनीषा पांडे, शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीण पश्चिम अध्यक्ष महेश गाडे, जावळी अध्यक्ष श्रीहरी गोळे, कराड उत्तर अध्यक्ष शंकरराव शेजवळ, कोरेगाव पूर्व मंडल अध्यक्ष निलेश नलावडे, वाई ग्रामीण मंडल अध्यक्ष दीपक ननावरे,युवा नेते विक्रमशील कदम,जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस जमदाडे, कदम यांच्यासह विविध पदाधिकारी,रामभक्त व मान्यवर उपस्थित होते.