पिंपरीमध्ये घरफोडी करून 1 लाख 83 हजारांचा मुद्देमाल लंपास; रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
11

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील बंद असलेल्या घरातून चोरट्यांनी १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमाकांत सुरेश पवार (रा. पिंपरी, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. ३ रोजी रात्री ८ वाजता मुलींचे क्लास सुटल्यानंतर आम्ही गावातील घराला कुलूप लावून शेतात असणाऱ्या घरी मुक्कामासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चुलत वहिनींचा फोन आला की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहे. मी लगेचच घरी पोहोचलो तेव्हा घरातील गोदरेज कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.

पत्नी माधुरी आल्यानंतर तिने गोदरेजच्या कपाटात लॉकर्समध्ये ठेवलेले सोने व चांदीचे दागिने पाहिले असता ते दिसले नाहीत. तसेच लाकडाच्या कपाटात साडीत ठेवलेले दागिनेही सापडले नाहीत. यावरून घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी घरातून एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, एक तोळा सोन्याचे गंठण, दोन तोळ्याचे सोन्याचे कानातील तीन वेल, तीन जोड चांदीचे पैंजण असा सुमारे १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.