सातारा प्रतिनिधी | सातारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, तपासणीमध्ये दोन दिवसांत सुमारे 213 ट्रॅव्हल्सची झाडाझडती घेण्यात आली असून त्यामध्ये 71 ट्रॅव्हल्सने नियमभंग केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड देखील करण्यात आला.
दिवाळीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तिकीट दरवाढीच्या तक्रारी वाढत असतात. त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ट्रॅव्हल्स संघटनांसोबत चर्चा करून त्यांना नियमापेक्षा जास्त तिकीट दर आकारण्यात येवू नये अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय सातार्याच्या वतीने राज्य मार्ग, जिल्हा मार्ग व महामार्गावर वायूवेग पथकामार्फत ट्रॅव्हल्सची तपासणी युध्दपातळीवर हाती घेण्यात आली आहे.
पथकांकडून गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातारा जिल्ह्यातून महामार्ग, जिल्हा मार्गावर धावणार्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 213 बसेसची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 71 बसेस दोषी आढळून आल्या आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वायूवेग पथकाला तपासणीमध्ये विना परवाना, परवान्याच्या अटीचा भंग करून वाहन चालवणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक या बाबी आढळून आल्या. दि. 9 नोव्हेंबर अखेर ट्रॅव्हल्सची तपासणी आरटीओमार्फत करण्यात येणार आहे.