गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजने अंतर्गत कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘इतकी’ कोटी मिळाली भरपाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाने 18 एप्रिल 2023 पासून विमा कंपनी विरहीत योजनेची निर्मिती करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने नवीन योजना राज्यामध्ये सुरु केली आहे. या योजनेत अपघाती मृत्यूसाठी 2 लाख रुपये तर अपघाती अपंगत्वासाठी 1 लाख रुपये संरक्षण देण्यात आले असून कराड तालुकास्तरीय समितीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक प्रस्ताव मंजूर केले आहेत. जून 2024 पर्यंत समितीने 50 प्रस्ताव मंजूर करून लाभार्थीना १ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे.

शेतकरी अपघातग्रस्त झाल्यानंतर आणि तो अपघात झाल्याचे समजल्यानंतर दहा दिवसांच्या आत संबंधित कुटुंबाला महसूल, पोलिस अधिकारी, योजनेचे प्राधिकारी, कृषी – पर्यवेक्षक संयुक्तरीत्या भेट देऊन – योजनेची माहिती दिली जाते. त्यानंतर योजनेचे प्राधिकारी तथा कृषी पर्यवेक्षक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन मंडल कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करतात.

मंडल कृषी अधिकारी त्या प्रस्तावाची छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठवतात. तालुकास्तरीय समितीत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा. समावेश आहे. समितीतर्फे या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते.

कराड तालुक्यात समितीचे प्रमुख म्हणून तहसीलदार विजय पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, डॉ. एम. पी. मिरजे, डॉ. अमित तिकडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसन्ना पवार, सचिन बिटले, कृषी अधिकारी कोमल घोडके, कृषी पर्यवेक्षक विजय साळुंखे या समितीमार्फत वर्षभर कामकाज करून ५० प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

कराड तालुक्यातील 50 प्रस्ताव मंजूर

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने नवीन योजना राज्यामध्ये सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत 18 एप्रिल 2023 पासून जून 2024 पर्यंत समितीने कराड तालुक्यातील 50 प्रस्ताव मंजूर करून लाभार्थीना 1 कोटी रुपये अनुदान मंजूर केले असल्याची माहिती कराड तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.