लोणंदला अग्निसुरक्षेसाठी तब्बल 1 कोटी 71 लाख निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोणंदची वाढती लोकसंख्या, शहरीकरणाचा वाढलेला वेग, वाढत चाललेले औद्योगिकीकरण याचा विचार प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून लोणंद नगरपंचायतीसाठी अग्निसुरक्षा अभियानांतर्गत एक कोटी ७१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आमदार मकरंद पाटील तसेच नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र रमेश क्षीरसागर तसेच सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भात सीमा वैभव खरात व रवींद्र क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी बांधकाम सभापती भरत शेळके, पाणीपुरवठा सभापती रशीदा इनामदार, नगरसेवक सचिन शेळके, मधुमती गालिंदे, शिवाजीराव शेळके, भरत बोडरे, सुप्रिया शेळके, गणीभाई कच्छी, सागर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

नगर विकास विभागाने लोणंद नगरपंचायतीला अग्निसुरक्षा अभियान बळकटीकरण करण्यासाठी १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली. प्रत्येक वर्षी येणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, औद्योगिकिकरण, वाढते नागरीकीकरण व लोकसंख्या, दळणवळण यामुळे प्रभावी अग्निसुरक्षा यंत्रणा अत्यावश्यक झाली आहे. अग्निसुरक्षेसाठी जागरूकता आणि तयारीच्या अभावामुळे घडणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या योजनेची गरज निर्माण झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी लोणंदमधे अद्ययावत अग्निशामक उपकरणांची आवश्यकता आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कार्यवाही केली जाऊ शकेल.

स्थानिक नागरिकांना अग्निसुरक्षेसाठी प्रशिक्षित करून त्यांच्या सहभागाने सुरक्षा वाढवणेदेखील आवश्यक आहे. उद्योगधंद्यांमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्यास मोठा धोका उदभवतो. यामुळे या योजनेमुळे उद्योगांना सुरक्षितता प्रदान करण्यास मदत होणार आहे.