कराड हद्दीत गोवा बनावटीचा 20 लाखांचा मद्यसाठा पकडला; दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी अमली पदार्थ तसेच बनावटीचा मद्यसाठा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान कराड येथील उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने कराड हद्दीत गोवा बनावटीचा तब्बल 20 लाखांचा मद्यसाठा पकडला असून यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाचे विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली कराड या कार्यक्षेत्रात शुक्रवार दि. 21 रोजी नांदलापूर ता. कराड जि. सातारा या गावच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गवरून अवैद्य मद्याची वाहतुक करत असताना एक संशयीत महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक ९MH-17-BY-9437) निदर्शनास आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा राज्य विक्री करीता असलेला विदेशी मद्याचे एकूण 110 बॉक्स म्हणजेच 750 मिली क्षमतेच्या 1 हजार 320 सिलबंद बाटल्या मिळून आल्या.

तसेच सदर चारचाकी वाहन तसेच दोन मोबाईल संच असा एकूण रुपये 17 लाख 37 हजार किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हामध्ये अजय वसंत कुळधरण (वय 28) व साहिल रामदास धात्रक (वय 20, दोघे रा. पिंपरी लोकें ता. राहाटा जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली असून दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) (अ),80,83,90,98,108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक व्ही. बी. शिंदे, दुय्यम निरीक्षक पी.व्ही.नागरगोजे, सहा.दु.निरीक्षक पी.आर.गायकवाड, जवान श्री. व्ही .व्ही. बनसोडे, यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्यातील तपास राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे दुय्यम निरीक्षक व्ही. बी. शिंदे हे करत आहेत.